बहुजन साहित्य संमेलन-२०२२.. रविवारी चिखलीत साहित्यीकांचा सोहळा रंगणार!

219

संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज)बहुचर्चित असलेले बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित बहुजन साहित्य संमेलन-२०२२ रविवार 20 नोव्हेंबर रोजी चिखली सारख्या ऐतिहासिक व विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून परिचित नगरीमध्ये दिग्गज व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत महामेळाव्यात आयोजीत करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थानी मेहकर येथील ज्येष्ठ कवी , समीक्षक आणि साहित्यिक किरण डोंगरदिवे असून उदघाटन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा पुरस्कारप्राप्त विचारवंत डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र तथा महाराष्ट्राच्या बाहेरील विविध राज्यांमधून आवर्जून या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजर असणाऱ्या शेकडो कवी, लेखक, कथाकार, नाट्यकार, कलावंत, शिल्पकार, लोक-कलावंत, गीतकार, गायक,अभिनेते इत्यादींच्या साक्षीने या साहित्य संमेलन २०२२ चा हा प्रतिभावंतांचा साहित्योत्सव साजरा होणार आहे.लिखाण , संगीत व कला प्रांतातील सर्वस्तरीय योगदानाचा संयोग याठिकाणी होणार आहे. बहुजन साहित्य संघाच्या वतीने मानवी सेवेमधे समर्पित जीवन जगणारे तसेच गीत,संगीत,गायन,नृत्य इत्यादी विविध क्षेत्रात ज्या मान्यवरांनी मोलाचे तथा उल्लेखनीय कार्य केले आहे व करीत आहेत,अशा व्यक्तींना फुले-शाहू-आंबेडकर हे बहुमानाचे पुरस्कार संमेलन सोहळ्यात -काव्यप्रदेशातील स्त्री- या एकमेव द्वितीय समीक्षा ग्रंथाच्या निर्मितीसाठी किरण शिवहर डोंगरदिवे, मेहेकर, – भाई तुम्ही कुठे आहात? – या नाट्यकृती साठी डॉ. ऋषीकेश कांबळे औरंगाबाद, वैचारिक लेखनास्तव डॉ.सतीश तराळ अमरावती, आदिवासी क्षेत्रातील अहर्निश कार्यासाठी आनंद महाजन अमरावती, मानवाधिकार क्षेत्रातील सेवेसाठी डॉ.मिलींद दहिवले नागपूर, सामाजिक क्षेत्रातील सेवेसाठी डॉ. शिवचरण उज्जैनकर मुक्ताईनगर, मनोरुग्णसेवेस्तव डॉ.नंदकुमार पालवे पळसखेड सपकाळ, निरक्षर असतांना सुद्धा काव्यक्षेत्रातील भरीव कार्यासाठी विमलताई माळी सोलापूर, साहित्य संमेलन क्षेत्रातील अखंड सेवेसाठी झेप संपादक डी.एन.जाधव औरंगाबाद, साहित्यातील 80 पुस्तके लिहिणाऱ्या विमलताई वाणी म्हसावद, अध्ययन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी डॉ.संघर्ष सावळे मलकापूर, बालअनाथ सेवासमर्पणास्तव संतराज आंबेकर जाळीचा देव, वृत्तपत्रीय सेवेसाठी संघपाल सिरसाठ अकोला, शैक्षणिक क्षेत्रातील कठोर वाटचालीस्तव डॉ.राजकुमार कांकरिया जळगांव आणि वैद्यकीय क्षेत्रातील गणमान्य कार्यासाठी डॉ.सावली राऊत औरंगाबाद या सर्व मान्यवरांना प्रदान करण्यात येतील.

स्वागताध्यक्ष हे पद उर्दु गझलकार डॉ. गणेश गायकवाड बुलढाणा हे भूषविणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून उप-मुख्यमंत्री यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले , साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, डॉ. प्रतिमा इंगोले, के. एस्. अतकरे बापू, डॉ. आनंद अहिरे, डॉ. मनोज निकाळजे, जीवन कुळकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. विजयकुमार कोठारी यांची उपस्थिती राहणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री रेणू जोशी यांचे शास्त्रीय नृत्याविष्करण हेही या आनंद यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. संमेलनाच्या प्रारंभीची संविधान ग्रंथ दिंडी तथा त्यात सहभागी असणारे लोक-कलावंतही लक्ष वेधून घेणारे ठरणार आहेत. अशा या अभिनव साहित्य संमेलन २०२२ चे आयोजक अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे, शाहीर मनोहर पवार, बबनराव महामुने, अ‍ॅड. सर्जेराव साळवे, किसन पिसे, महेश वाधवाणी तथा ज्ञानेश्वर पचांगे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.