बुलढाणा जिल्ह्यात चाललंय तरी काय ? बलात्कार झाला पण न्याय नाही मिळाला; पिडीत महिला शिवजयंतीला करणार आत्महत्या!

529

मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला इशारा

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11 ‍Feb. 2023) एकीकडे सन 2022 मध्ये पोलिस विभागात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा अमरावती विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एक महिला बलात्कार, अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोस्टे.ला तसेच पोस्टे.नांदुरा पोलिस अधिकारी यांच्याकडे गेली असता दोन्ही तक्रार प्रत सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. चौकशीच्या नावावर नांदुऱ्याच्या पोलिस अधिकाऱ्याने 3 तास बसवून ठेवीत स्त्रीत्वाला लज्जा पोहचवेल असे प्रश्न उपस्थित करुन मानसिक छळ केला आहे. अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर 18 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास शिवजयंतीदिनी 19 फेब्रुवारी रोजी मंत्रालय, वर्षानिवास किंवा कोणत्याही पोस्टे.समोर आत्महत्या करण्याचा इशारा पिडीतेने मुख्यमंत्री यांना 10 फेब्रुवारी रोजी दिला आहे.

पिडीतेवर 25 जानेवारी 2023 रोजी संगणमतातून कट कारस्थान रचून बलात्कार, अत्याचार झालेला असल्याचा आरोप पिडीतेने निवेदनात करीत पिंपळगाव राजा पोस्टे. येथे पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली असता सायंकाळी 5 ते रात्री बारापर्यंत चौकशी करीत नांदुरा पोस्टे. ला तक्रार देण्याचे सांगितले. पोस्टे. आवारातच गैरअर्जदार आरोपीचे नातेवाईक, गुंड लोकप्रतिनिधींनी पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली, सदर गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक बुलढाणा, एसडिपीओ मलकापूर यांना देण्यात आली. पो.अधीक्षक, एसडीपीओ यांच्या निर्देशानुसार नांदुरा पोस्टेला पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली असता तिथेही तक्रार न घेता फक्त चौकशी करीत चार तास बसून ठेवण्यात आले. सदर गंभीर प्रकरणाची चौकशी करुन संबंधित पोस्टे.अधिकारी यांचे कॉल रेकॉर्ड, व्हाट्सअप रेकॉर्ड, तत्कालीन नमूद वेळेतील सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात यावे. या मागणीसाठी गोपनीय पुरावे देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करुन 18 फेब्रुवारी पर्यंत न्याय न मिळाल्यास 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी मंत्रालय, वर्षा निवास किंवा कोणत्याही पोस्टे. समोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा पिडीत महिलेने निवेदनात दिला आहे.