मोताळा शहराला शुध्द स्वच्छ पाणी मिळण्यासाठी शेकडो महिलांचा नगर पंचायतवर भव्य घागर मोर्चा

295

नगर पंचायत प्रशासनाचा शिवसेना व भाजपाने नोंदविला निषेध!
मोताळा(BNUन्यूज) मोताळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून शहर वासीयांना दुषीत पाणी पुरवठा करण्यात येतो. दुषीत पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील कोणत्याच प्रकारची दखल न घेण्यात आल्याने आज सोमवार 19 सप्टेंबर रोजी नगर पंचायत प्रशासन कुचकामी ठरत असल्याने शिवसेना-भाजपा युतीच्यावतीने शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी महिलांचा भव्य मोर्चा काढून महिलांनी नगर पंचायत समोर 2 तास ठिय्या आंदोलन करीत शेकडो महिलांनी घागरी फोडून निषेध नोंदविला. तर काँग्रेसने पत्रकार परिषद घेवून पुराव्यानिशी सर्व आरोप फेटाळून लावल्याने शिवसेना-भाजपा व काँग्रेसच्या वादामध्ये शहरवासीयांना खरचं शुध्द पाणी मिळेल का? असा प्रश्न यानिमीत्याने उपस्थित केल्या जात आहे.

मोताळा व चारगाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मोताळा शहराला पाणीपुरवठा होत असतो. पाणीपुरवठा शुद्ध व जंतू विरहित व्हावा यासाठी नळगंगा धरणावर फिल्टर यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. फिल्टर मधील पाणी फिल्टर करणारा प्लांट, ढवळण टाकी, क्लोरीन सयंत्र, पाणी तपासणी प्रयोगशाळा, पर्यायी मोटर आदीसह सर्व यंत्रणा नादुरुस्त असल्याने नागरिकांना धरणांमधील पाणी पुरवठा फिल्टर न होता त्याच पद्धतीने वितरित केल्या जातो. अनेकवेळा ब्लिचिंग सुद्धा टाकला जात पाणी अशुद्ध स्वरुपाचे असून त्यामध्ये जंतू सुद्धा आढळतात. सदर बाब वारंवार नगर पंचायत प्रशासनाच्या नजरेस बाब आणून दिल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेने या धरणावर दाताळा सहित 15 गाव पाणीपुरवठा योजना सुद्धा सुरू केलेली आहे. योजना सुरु करताना येथील प्लांटची दुरुस्ती व देखभाल करू, असे आश्वासन महाराष्ट्र ग्रामीण पुरवठा विभागाने दिले होते परंतु त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही शहरवासीयांना शुध्द स्वच्छ पाणी मिळण्यासाठी मोताळा शहरातील महिलांनी शुद्ध पाणी द्या, नागरिकांच्या जीवाशी खेळ बंद करा, पाणी हेच एक जीवन आहे तसेच नगर पंचायत कार्यालयासमोर घागरी फोडून निषेध व्यक्त करीत दीड ते दोन तास संतप्त महिलांचे नगर पंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरु होते निवेदन घेण्यासाठी न.पं.मुख्याधिकारी हजर नसल्याने बोराखेडी पोस्टे.ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी तहसिलदार डॉ.सारीका भगत यांना बोलावून आंदोलन कर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या भव्य घागर मोर्चामध्ये आमदार स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ, शिवसेना नगर सेवक सचिन हिरोळे, गणेश पाटील, बाबा कुरेशी, अनिता झंवर, सुरेश खर्चे, प्रविण पाटील, लताताई पारस्कर, अंजना खुपराव, सौ.बावस्कर, अशोक झंवर, सविता जवरे, गजानन वाघ, भाजपाच्या सौ.कुमूदिनी कोलते, गजानन मातळे यांच्यासह शिवसेना-भाजपा कार्यकर्ते व शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. बोराखेडी पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय हा योगायोग मुख्याधिकारी महिला,नगराध्यक्षाही महिला, आंदोलन कर्त्याही महिलाच!
शहर वासीयांना शुध्द पाणी मिळण्यासाठी शिवसेना-भाजपाच्यावतीने नगर पंचायतवर काढण्यात आलेल्या घागर मोर्चात नगर सेविकासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी प्रचंड घोषणाबाजी करीत घागरी फोडून निषेध नोंदविला. महिलांचे निवेदन घेण्यासाठी महिला नगर पंचायत सीईओंनी स्व:त हजर राहून निवेदन घेणे क्रमप्राप्त होते. महिलांसमोर आंदोलन करण्याचा प्रकार उद्भवू नये, यासाठी महिला नगराध्यक्षांनी घागर मोर्चा काढणाऱ्या महिलांच्या समस्या ऐकून घेणे आवश्यक होते. परंतु असे न झाल्याने मुख्याधिकारी महिला, नगराध्यक्षही महिला व आंदोलन कर्त्याही महिला, महिलांना शांत करण्यासाठी अखेर ठाणेदार राजेंद्र पाटील यांना महिला तहसिलदार डॉ.सारीका भगत यांना आंदोलन कर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी पाचरण करावे लागले, काय हा योगायोग!

काँग्रेस म्हणते आमचा काय दोष?पुराव्यानीशी फेटाळले सर्व आरोप!
काँग्रेसच्यावतीने नगराध्यक्षा श्रीमती माधुरी देशमुख, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, उपाध्यक्षा शहनाजबी शे.सलीम, पाणी पुरवठा सभापती रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सेवकांच्या उपस्थितीत दुपारी पत्रकार परिषद घेतली. सदर परिषदमध्ये पुराव्यानीशी शिवसेना-भाजपाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.