देऊळगाव महीच्या लाचखोर ग्रामसेवकाला बुलढाण्यात 3 हजाराची लाच घेतांना पकडले!

291

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (29 Mar.2023) शासकीय पगाराव्यतीरिक्त स्वत:च्या फायद्यासाठी लाच स्वीकारणे हा गुन्हा आहे, परंतु तोंडाला रक्त लागलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना लाचेचा मोह आवरत नसल्यामुळे ते अलगद ॲन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकतात. असाच एक प्रकार देऊळगाव मही येथील ग्रामसेवक विजय रिंढे यांच्यासोबत घडला असून त्यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे 3 हजाराची लाच स्वीकारतांना बुलढाणा लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पडकले आहे. सदर कारवाई आज 29 मार्च रोजी करण्यात आली.

देऊळगाव मही ता.देऊळगाव राजा ग्रामपंचायत कर्तव्यावर असलेल्या ग्रामवसेवक विजय साहेबराव रिढे (वय 50) याने तक्रारदार यांची देऊळगाव मही येथे सामायिक शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. सदरची शेतजमीन अकृषक नसताना त्या जमिनीबाबत ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही येथे नमुना 8 अ रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे. सदर नोंद रद्द करण्याकरिता तक्रारदार यांनी पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्याकडे अर्ज केलेला होता. सदर अर्ज ग्रामपंचायत देऊळगाव मही येथे वर्ग करण्यात आला होता. सदर नोंद रद्द करण्यासाठी ग्रामसेवक विजय रिंढे यांनी 3 हजार रुपयांची मागणी करुन पंचा समक्ष आज बुधवार 29 मार्च रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे केलेल्या सापळा कारवाई दरम्यान 3 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर कारवाई ला.प्र.वि.बुलढाणा पोलिस निरीक्षक सचिन इंगळे व पथकातील पो.हवा. विलास साखरे, पो.ना. प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे , जगदीश पवार, मपोकॉ. स्वाती वाणी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.

लाचेची मागणी केल्यास बिनधास्त संपर्क साधा..

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा पोलीस उप अधीक्षक
दुरध्वनी क्रं – 07262- 242548 व टोल फ्रि क्रं 1064 वर सपंर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.