आपली सुरक्षा आपल्या हाती….; ग्रामस्थांनी मोटार पंप चोरट्याला केले पोलिसांच्या स्वाधीन !

73

मोताळा-(29 Sep.2023)’कानून के हात बहोत लंबे होते है’ पोलिसांच्या नरजेत कोणताही चोरटा किंवा अपराधी सुटत नाही. परंतु आजकालच्या चोरट्यांचे नेटवर्क लई..भारी झाल्याने ते अनेकवेळा पोलिसांच्या हाती लागत नाही. मग अशावेळी सर्वसामान्य नागरिक देखील ‘आपली सुरक्षा आपली हाती’ प्रमाणे चोरट्यांना पकडून देण्याचे काम करतात, असेच एक किस्सा 28 सप्टेंबरच्या रात्री 7 वाजेच्या सुमारास राजुर शिवारातील गट नं. 92 मध्ये शेतात घडला. ग्रामस्थांनी मोटारपंप चोरणाऱ्या चोरट्याला चोप देवून बोराखेडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

महादेव देवानंद भगत (वय 24) रा. अकोला ह.मु. मुर्ती यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांचे आई वडील वसिम खान बुलढाणा यांचे राजूर शिवारातील गट नंबर 92 मध्ये हजर असतांना तेथे 3 जण शेतात असलेल्या पाण्याच्या मोटारपंप जवळ बसलेले दिसल्याने फिर्यादी त्यांच्याकडे धावत गेल्याने दोघेजण पळून जाण्यास यशस्वी झाले. एकाला पकडले असता तो मुर्ती गावातील ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड होता, त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने शेतातील मोटारपंप चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगत त्याचे दोन साथीदार पळून गेल्याचे सांगितल्याच्या फिर्यादीवरुन आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड व इतर दोन यांच्यावर बोराखेडी पोलिसांनी भादंवीचे कलम 379, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बिट जमादार पोहेकाँ.कपिश काशपाग हे करीत आहे.

30 ते 40 मोटारपंप चोरीला ?

राजूर परिसरात 1 ते दिड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 30 ते 40 शेतकऱ्यांचे विद्युत मोटारपंप चोरीला गेल्याच्या घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील काहींनी बोराखेडी पोलिसात फिर्याद देखील दिली आहे. तर काहींनी पोलिसांत फिर्याद दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. सदर परिसरात चोरील्या गेलेल्या मोटारपंप चोरट्यांचे रॅकेट पकडण्याची मागणी मुर्ती व राजूर परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.