हॅलो पोलिस…हॅलो पोलिसमुळे ज्वेलर्स मालकाला लुटण्याचा प्रयत्न फसला ! मोताळा तालुक्यातील पुन्हई शिवारातील घटना

16

मोताळा: चोरटे, दरोडेखारे केंव्हा कोणावर दरोडा टाकतील याचा नेम राहिलेला नाही. मोताळा तालुक्यातील बोराखेडी-वडगाव रोडवर असाच एक प्रकार 22 जूनच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. चार चोरट्यांनी पुन्हई शिवारातील सुनिल गर्दे यांच्या शेताजवळ वडगाव येथील एका ज्वेलर्स मालकाजवळील चांदीचे दागिणे लुटण्याचा प्रयत्नात झटापटी होवून चाकू हल्ल्यात ज्वेलर्स मालक राजेंद्र वाघ जखमी झाले. मात्र, त्यांनी हॅलो पोलिस…! हॅलो पोलिस म्हटल्याने चोरटे पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला.

तालुक्यातील वडगाव (खं) येथील राजेंद्र दुर्योधन वाघ यांचे मोताळा येथील आठवडी बाजारात विजय ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता ते मोताळा येथून दुचाकीने वडगाव येथे जाण्यासाठी निघाले असता, पुन्हई शिवारात गर्दे यांच्या शेताजवळ त्यांच्यासमोर एक दुचाकी येवून दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या जवळील दागिण्यांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने दुसरी दुचाकी आली त्यातून दोघेजण उतरले त्यांनी राजेंद्र वाघ यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील दागिण्याची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघ यांनी बॅग सोडली नसल्यामुळे झटापटीमध्ये चोरट्यांनी त्यांच्या मानेवर चाकुने हल्ला चढविला. मात्र, वाघ यांनी समयसूचकता दर्शवित हॅलो पोलिस..,हॅलो पोलिस… म्हटल्याने चारही चोरटे पळून गेले. घटनेचे गांभीर्य पाहता बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेची टीम बोराखेडी पोलिस स्टेशन येथे पोहचली. ज्वेलर्स मालक राजेंद्र वाघ हे बोराखेडी पोस्टे.ला पोहचले होते.

दरोडेखोरांना पकडणे मोठे आव्हान

चोरट्यांनी ‘ब्रेक के बाद’ आपले नेटवर्क सक्रीय केले आहे. पल्सरवरुन पुन्हई शिवारात चोरट्यांनी ज्वेलर्स मालकाचे दागिणे लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्वेलर्स मालक राजेंद्र वाघ यांनी हिंमत न हारता हातातील दागिण्याची बॅग न सोडता चोरट्यांशी झटापटी करीत हॅलो पोलिस…हॅलो पोलिस मोबाईलवर बोलण्याचा बहाणाकरुन आपले दागिणे वाचविले. मात्र, या झटापटीमध्ये चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात ते जखमी झाले. ‘त्या’ चार दरोडेखोरांना पकडणे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.