आता ‘प्रतापराव’ की केंद्रातील ‘नरेंद्र’ प्रमाणे बुलढाण्यात ‘नरेंद्र’ची जादू ? फैसला काही तासातच; विजयाची माळ कुणाच्या गळ्यात ?

21

बुलडाणा : लोकसभेची निवडणूक २६ एप्रिल रोजी जिल्ह्यात पार पडली. ३९ दिवसाच्या कालावधीनंतर मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निकालात जनतेला परिवर्तन पाहिजे याची आकडेमोड होणार आहे. जिल्ह्यात शिंदे शिवसेना-भाजपा, अजित पवार राष्ट्रवादीचे युतीचे सहा आमदार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा दावा करीत आहे. तर मोताळ्यातील सभेतील उबाठा संजय राऊत यांच्या, दगडालाही शेंदूर फासला तर तोही निवडून येतो, हे वाक्य खरे ठरले तर ‘नरेंद्र खेडेकर’ जिल्ह्याचे भावी खासदार असतील? परंतु सहा आमदारांच्या प्रतिष्ठेचे काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केल्या जात आहे.

बुलढाणा लोकसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत मतदारांनी ‘अपक्ष’ खासदाराला दिल्ली दरबारी पाठविल्याची नोंद नाही, त्याला आता अपवाद ठरला तर शेतकरी नेते रविकांत तुपकर बाजी मारतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 26 एप्रिल रोजी 62.03 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजाविला. त्यामध्ये 6 लाख 3 हजार 525 पुरुष तर 5 लाख 2 हजार 226 अशा 11 लाख 5 हजार 751 मतदान केले. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण 64.67 टक्के तर महिलांचे प्रमाण 59.12 टक्के एवढे होते. काही तासातच निकाल जाहीर होणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जनतेने तीनवेळा निवडून आणलेल्या प्रतापराव जाधवांना चौथ्यांदा संधी दिली का? की परिवर्तन केले, तर त्याचा फायदा नरेंद्र खेडेकर की रविकांत तुपकरांना होईल का? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करीत आहेत.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सध्या जिल्ह्यात सहा आमदार आहेत. त्या आमदारांनी नरेंद्र मोदींच्या विजयासाठी ‘प्रतापराव’ यांच्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांचे परिश्रम फळाला येते की, ‘सहानुभूती’ व ‘परिवर्तना’मुळे महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेचे प्रा.नरेंद्र खेडेकर बाजी मारतात ? याचा फैसला होण्यासाठी आता काही तासच उरले आहेत.

सट्टा बाजार की पारावरील अंदाज ?

सट्टा बाजारात प्रतापराव जाधव निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर सर्वसामान्य जनतेने उबाठा शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर निवडून येतील याची आकडेमोड केली. विशिष्ट समाजाचे 2 लाख 75 हजाराचे गठ्ठा मतदान, नाराज झालेला हिंदु व एक विशिष्ट समाज यांचे मतदान, वंचितपासून दुर गेलेला समाज व ऐनवेळी मिळालेले क्रॉस वोटींग, यावरुन नरेंद्र खेडेकरांचा 50 ते 60 हजाराने निवडून येण्याचा पारावरील गप्पातील केलेला अंदाज खरा ठरतो की? प्रतापराव जाधवांना चौथ्यांदा संधी मिळते?