लंपी संसर्गाचा आकडा वाढतोय…! पशुवैद्यकीय दवाखाने आता सकाळी 8 पासून सायंकाळी 6 पर्यंत सुरु राहणार!!

224

संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज) राज्यामध्ये सध्या लंपी आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोवंशीय पशुधनास झालेल्या विषाणूजन्य लंपी चर्म रोगावर नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळेत सुधारणा करण्यात आली असून आता सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा पशुवैद्यकीय सर्वच चिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, श्रेणी 1,श्रेणी 2 चे सर्व दवाखाने, फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळा सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. जेवणाच्या सुट्टीची वेळ दुपारी 1 ते 2 अशी राहणार आहे. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अशोक लोणे यांनी सांगितले. लंपी या आजाराचा मनुष्यास कोणताही प्रकारचा धोका नाही. पशुपालकांनी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा व नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन..
लंपी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून या आजारासंबंधी पशुपालकांच्या तक्रारी निवारण करण्या साठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 19 62 व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0 72 62,24 26 83 व टोल फ्री क्रमांक 1077 सुरू करण्यात आला आहे. या आजारासाठी वेळीच उपचार केल्याने जनावरे पूर्णपणे बरी होतात.