मोताळा तालुक्यात लंपीचे थैमान.. लंपी चर्मरोगामुळे तालुक्यातील 28 जनावरे दगावली!

593

विष्णु शिराळ..
मोताळा(BNUन्यूज)-लंपी चर्मरोगाचा संसर्ग मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून पशुपालक मोठ्या प्रमाणात भयभीत झाली आहेत. लंपीच्या संसर्गामुळे मोताळा तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार 28 जनावरे दगावल्याची नोंद आहे. आकडेवारीमध्ये मात्र दररोज वाढ होत आहे. पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने 24 हजार जनावरांचे लसिकरण करण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील टाकळी(वा)येथील दोन जनावरे तर आव्हा येथे 2 जनावरे लंपीने दगावली आहेत.
राज्याभरात लंपी आजाराने मोठे थैमान घातले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुध्दा त्याचा आकडा झपाट्याने वाढत आहे. लंपी चर्मरोग हा संसर्गजन्य असल्यामुळे लसीकरण केल्यानंतरही लंपीचा संसर्ग होवू शकतो, असे पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने सांगण्यात आले. आज शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी मोताळा तालुक्यातील टाकळी (वा) येथील पशुपालक विजय वासुदेव शिराळ यांचा 40 हजार रुपये किमतीचा बैल तर संदीप वसंतराव शिराळ यांची 10 हजार रुपये किमतीची गाय लंपीच्या चर्मरोगामुळे दगावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच डॉ.धिरज सोनटक्के यांनी घटनास्थळी जावून जनावरांच्या अंगावर गाठी झाल्याने दगावल्याची नोंद केली आहे. सदर जनावरांवर शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नियंत्रणात उपचार सुरु होते, परंतु जनावरे वाचू शकली नाहीत. लंपी संसर्गामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा…
मोताळा तालुक्यात 24 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार 28 जनावरे लंपीच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे. लसीकरण केल्यानंतरही जनावरांची मृत्यू होवू शकतो. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी आजारी व निरोगी जनावरे वेगवेगळी ठेवावी. बाधित व निरोगी जनावरांना एकत्र चारा-पाणी किंवा चरायला सोडू नये. बाधित जनावरांचा गोठा, संपर्कात आलेली भांडी तसेच इतर साहित्य सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावीत तसेच निबांच्या पाल्याची धूळ फवारणी करुन जनावरांची काळजी घ्यावी.
-एस.आर.चोपडे
पशुवैद्यकीय अधिकारी,मोताळा