केळवद येथे कर्जबाजारीला कंटाळून 32 वर्षीय उच्चशिक्षीत शेतकऱ्याची आत्महत्या!

461

राम हिंगे..
बुलढाणा-(BNU न्यूज) सततची नापीकी व कर्जबाजारीला कंटाळून चिखली तालुक्यातील केळवद येथील एका 32 वर्षीय उच्चशिक्षीत तरुणाने 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास असोला बु.ता.चिखली परिसरात आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव समाधान विठ्ठल पांढरे असे आहे.

केळवद ता.चिखली येथील रहिवासी समाधान विठ्ठल पांढरे (वय 32) या युवा शेतकऱ्यांचे शिक्षण MA.Ded झालेले असून नोकरी न मिळाल्याने समाधान हा त्याच्याकडे असलेल्या 4 एकर कोरडवाहू शेतीमध्ये कष्ट करायचा, परंतु कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतीला लावलेला पैसाही मागील 2 ते 3 वर्षापासून निघत नसल्याने खाजगी कर्ज व स्टेट बँक शाखा केळवदचे 1 लाख 60 हजाराचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा यामुळे समाधान पांढरे हा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता. अश्यातच समाधान हा 10 ऑक्टोबर रोजी घरातून निघून गेला होता. 11 ऑक्टोबरला सकाळी 9.30 वाजता असोला बु. परिसरात विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शिक्षण घेवून देखील नोकरी मिळाली नाही, शेतीने सुध्दा साथ दिली नाही. त्यातच कर्जाचा वाढता डोंगर यामुळे समाधान पांढरे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा छोटा भाऊ एकनाथ पांढरे यांनी ‘बुलडाणा न्यूज अपडेट’शी बोलतांना सांगितले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पांढरे कुटुंबीयांवर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. पांढरे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.