धाड,चांडोळ,रायपूर,पिं.सराई परिसरात परतीच्या पावसाचे तांडव!

343

पिं.सराई येथे तिघांना पुरातून गावकऱ्यांनी वाचविले;
करडी प्रकल्पाचे 34 स्वयंचलीत दरवाजे उघडले; सर्तकतेचा इशारा!!

बुलढाणा(BNU न्यूज) बुलढाणा तालुक्यात काल व आज परतीच्या पावसाने धाड, चांडोळ, रायपूर, पिं.सराई परिसरात थैमान घातल्याने नद्यांना मोठे पूर आले आहेत. पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. करडी लघू प्रकल्पाचे 34 स्वयंचलीत दरवाजे उघडले असून त्यातून 1190 क्सुसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने गावकऱ्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रायपूर येथे नदीला पूर आल्याने आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. पिं.सराई येथील शाळेत 2 मुले व सोयाबीन सोंगून घरी येणारी महिला पाण्यात अडकल्याने त्यांना गावकऱ्यांनी पूरातून सुखरुप बाहेर काढले.

मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांडोळ येथे जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशाही मावळल्या, तर अनेकांची सोंगून ठेवलेली पिके पावसाच्या तडाख्यात मातीमोल झाली आहे. चांडोळ येथील दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नद्या ओसंडून वाहत आहे. करडी प्रकल्पाचे 34 स्वयंचलीत दरवाजे उघडले असून ११९० क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सुरु असल्याने धामणा धरण हा बाकी गावांसाठी जरी ठरला असला तरी धरणा खालील टाकळी, सातगाव, म्हसला, ढंगारपूर, चांडोळ, इरला नदी काठावरील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. तसेच रायपूर येथे आज 20 ऑक्टोबर रोज दुपारी झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर आल्याने जवळपास आठ तास वाहतूक ठप्प झाल्याने ढसाळवाडी, सैलानी, पिंपळगाव सराई, पळसखेड भट, सोनेवाडी, पांगरी, सिंदखेड, मातला या गावांमधील बुलढाणा व चिखली येथे ये-जा करणाऱ्या नागरीक, शिक्षक, विद्यार्थी, पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासह अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुरामध्ये पळसखेड भट येथील भुजंगराव भोसले यांचा बैल वाहत गेला होता, त्याला रायपूर येथील नागरीकांनी बाहेर काढले. येथील रोडचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे, आतापर्यंत पुलाचे काम झालेले नाही.

धाड येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास पावसासह विजेच्या प्रचंड कडकडाटात या भागात प्रचंड पाऊस झाल्याने औरंगाबाद आणि धामणगाव रस्ते जलमय झाल्याने या रस्त्यावर वाहतूक बंद पडली होती. संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांची दैना उडाली. विजा मोठ्या प्रमाणावर कडाडल्याने विद्युत तारा तुटल्यामुळे भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास तिन तासापेक्षा अधिक वेळ मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला मोठा पूर आला तर गावालगतचे नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने औरंगाबाद रस्ता व धामणगाव रस्ता बंद पडला होता तसेच गावातील अनेक घरामध्ये पुराचे घराम शिरले होते. तर शेतकऱ्यांनी सोंगणी करुन ठेवलेली सोयाबीन पिके वाहून गेल्याची माहिती आहे. आजच्या पावसामुळे धाड भागातील जवळपास ४५ गावशिवारात असलेल्या नदी नाल्यांना पूर आल्याने नदी नाल्याच्या काठी असलेल्या शेतीमधील सोयाबीन, मका आदी खरीपाच्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पिं.सराई , सैलानी, पळसखेड भट, रायपूर, सिंदखेड, मातला, वाडी, भडगाव परिसरात जोरदार पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आला होता. यामध्ये दोन शालेय विद्यार्थी शाळेतून घरी येत असतांना तसेच सोयाबीन सोंगून येणारी महिला अडकली हेाती, त्यांना गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.