ग्रामपंचायत निवडणूकीत जिल्हास्तरीय नेत्यांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले

252

संजय निकाळजे..
बुलढाणा(22Dec.2022) जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्या १८ डिसेंबर रोजी शांततेत पार पडल्या, त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी घोषीत करण्यात आल्या.
२१ ग्रामपंचायती अविरोध झाल्यामुळे २५१ ग्रामपंचायतसाठी मतदान झाल्यानंतर निकाल लागले. यामध्ये विविध राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र मतदारांनी त्यांना चांगलाच दणका देऊन त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.

ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजण्यात येणारी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक, या निवडणुकीत गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी खेळल्या जातात, बऱ्याच गावांमध्ये जिल्ह्याचे पदे काही व्यक्तींना दिली जातात, मात्र ही पदे ते फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतात. सामान्य मतदारांचा ते फक्त वापर करून घेतात. मात्र मतदार सुद्धा त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्याची जागा मतदानातून दाखवून देतात. जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हास्तरीय पदे भूषविणाऱ्या नेत्यांनी आपापल्या गावांमध्ये जवळचे नातेवाईक किंवा जवळचे उमेदवार उभे केले होते. मात्र ‘नाव मोठे लक्षण खोटे’ असणाऱ्या नेत्यांना मतदारांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलाच दणका देऊन पराभूत केले. तर गोरगरिबांचे, सामान्य नागरिकांचे कामांना महत्त्व देणाऱ्या नेत्याला किंवा त्या व्यक्तीला मतदार स्वीकारतात व त्याचे ऋण फेडत असतात. सुख दुःखामध्ये जो आपल्या कामी येईल त्याला मतदान रुपी सहकार्य सढळ हाताने करतात. या निवडणुकीमध्ये ज्या ग्रामपंचायत मध्ये पाच वर्षे आधी थेट सरपंच पदाच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा सरपंचाची थेट निवडणूक झाल्याने ही निवडणूक अटीतटीची समजल्या गेली. अतिशय कमी फरकाने अनेक ठिकाणचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे काही ठिकाणी मिरवणुका निघाल्या. जिल्ह्यामध्ये सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीचे दुपारपर्यंत जवळपास सर्वच निकाल हाती लागले. त्यामध्ये अनेक ठिकाणचे निकाल अतिशय धक्कादायक लागले. बऱ्याच ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला तर काही ठिकाणी आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले. तर बऱ्याच ठिकाणी नेत्यांनी आपल्या घरातील सदस्य,जवळचे नातेवाईक यांना केले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारल्यामुळे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अशा नेत्यांची किती ‘चलती’ आहे, हे त्या निमित्ताने दिसून आले आहे.

उदयनगरला विकास कामांचा फायदा..

चिखली तालुक्यामध्ये अतिशय प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या उदयनगरच्या निवडणुकीत ग्रामपंचायत वर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे यांची समर्थ साथ विद्यमान सरपंच भाई प्रदीप अंभोरे त्यांचे कारकीर्दीतील विकास कामे आणि तरुण मतदारांचा उत्साह या निवडणुकीमध्ये बघावयास मिळाला. याच त्रिसूत्री वर या ठिकाणची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे मनोज लागवडकर तब्बल १५०० मतांनी विजयी झाले. त्यामुळे विद्यमान सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांच्या विकास कामांना या ठिकाणी प्राधान्य मिळाले. त्याचप्रमाणे सरपंच सोबत निवडून आलेले जास्तीत जास्त सदस्य हे काँग्रेसचेच निवडून आल्यामुळे व चिखली विधानसभा मतदार संघात उदयनगर जिल्हा परिषद सर्कल हे महत्त्वाचे असल्याने माजी आमदार राहुल बोंद्रे यांनाही पुढे हे सर्व सोपे झाले आहे,एवढे मात्र निश्चित!