राष्ट्रसंतांच्या विरोधात बोलण्यास बंदी करण्याचा कायदा करावा-हभप.शास्त्री महाराज

386

BNU न्यूज नेटवर्क..
नांदूरा (18 Mar.2023)राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा महाराजांवर कारवाई करून महाराष्ट्रात बंदी घालावी. पंढरपूरच्या वारीला कुंभमेळ्याप्रमाणे निधी, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा, सुरक्षा, विमा यासह अत्यावश्यक सुविधा देण्यात याव्या. राष्ट्रसंतांच्या विरोधात बोलण्यास बंदी करण्याचा कायदा करावा, असे मत राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष वारकरी भूषण हभप.वासुदेव महाराज शास्त्री यांनी बोलतांना व्यक्त केले.

नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे शुक्रवार 17 मार्च रोजी राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजीत करण्यात आले होते. तीन सत्राचे सायंकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात पूजन, परिषदेची भूमिका, मान्यवर परीचय, द्वितीय सत्रात मनोगत आणि ठराव पारित केले. तर तृतीय सत्रात किर्तन प्रवचनाने समारोप करण्यात आला. यावेळी हभप.वासुदेव महाराज शास्त्री बोलत होते. विधिवत धर्मपीठ पूजन, मंगल अष्टक आणि तुकोबांच्या प्रतिमेचे पूजन करून वारकरी परिषदेच्या प्रथम सत्राला सुरुवात करण्यात आली. राज्यस्तरीय वारकरी परिषद वारकरी भूषण हभप .वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत तर जूना आखाड्याचे महामंत्री परमपूज्य श्री रामभारती महाराज, हिंदू आणि हिंदुत्वाचे अभ्यासक सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाशदादा काकडे, विश्व वारकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बोरघाटे, भैरवगड संस्थांनचे ज्ञानेश्वर म‌हराज वाघ आळंदीकर, रामेश्वरमचे परमपूज्य पांडुरंग दास, माजी राज्यमंत्री मंत्री गुलाबराव गावंडे, विश्व वारकरी संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, वारकरी परिषदेचे मुख्य संयोजक Adv.सतीशचंद्र रोठे, हभप दादा महाराज पाटील, हभप सोपान महाराज येरळीकर, शेतकरी नेते गजानन दादा अमदाबादकर, शिंदे गट शिवसेना चे प्रतिनिधी जि.प.सदस्य बलदेवराव चोपडे, शिवा पाटील जुनारे यांच्यासह देशातील वारकरी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी,आश्रमांचे मठाधिपती, किर्तनकार, प्रवचनकार धर्मपिठावर उपस्थित होते.

महिला व वारकऱ्यांसह विचारवंत, व्याख्याते, प्रबोधनकार,संत महंतांची मांदियाळी, महिलांची भरगच्च उपस्थिती वारकरी परिषदेचे विशेष आकर्षण ठरली. केंद्र व महाराष्ट्र सरकारने बागेश्वर धामला सामाजिक, धार्मिक वितृष्ट निर्माण करण्यासाठी समोर केले आहे. देशातील सर्व धार्मिक स्थळांना वेगळा न्याय आणि पंढरपूरला वेगळा न्याय ही सावत्रपणाची वागणूक आहे. काही स्वयंघोषित वारकरी संघटना आजही तुकारामांच्या अवमानाबद्दल बोलायला तयार नाही त्यांचाही निषेध. वारीतील अपघातांचे वाढते प्रमाण, किर्तनात दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार, वारकऱ्यांच्या वारीतील समस्याची दाहकता लक्षात घेता सरकारने त्वरित राज्यस्तरीय वारकरी परिषदेतील ठरावांची त्वरीत पूर्तता करावी. असा एकंदरीत सुर राज्यस्तरीय वारकरी परिषदेच्या तीन सत्रातील प्रमुख मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत,पसायदान आणि महाप्रसादाने वारकरी परिषदेची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी आयोजक आझाद हिंद वारकरी संघटना, विश्व वारकरी संघटना, राष्ट्रसंत दत्तूजी महाराज संस्थान, बरफगाव, आझाद हिंद शेतकरी संघटना, महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संघटना पदाधिकारी, प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले.