बुलढाणा शहरात चाललंय तरी काय ? युवकाला दोघांनी केली दिवसाढवळ्या बेदम मारहाण!

66

बुलढाणा- (17 OCT.2023)मागील तीन वर्षाचा गुन्हेगारी रिपोर्ट पाहिला असता बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात दिवसाढवळ्या हाणामाऱ्या आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. कुणीही आपली एकदोन जणांची गँग घेवून येतो आणि रपारपी करुन जातो, अशीच एक घटना बुलढाणा शहरातील धाड नाक्यावरील जैस्वाल यांच्या दुकानासमोर 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. ‘न भय ना भिती’ दोन युवकांनी हर्षल लोखंडे याला नाका, कानातून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण केली. याप्रकरणी बुलडाणा शहर पोस्टे.ला दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सुभाष लोखंडे रा.रामनगर यांनी बुलढाणा शहर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते सोमवार 16 ऑक्टोबर रोजी एका हॉटेलवर कामाला गेले असता त्यांना एका इसमाने फोन करुन सांगितले की, तुमच्या मुलगा हर्षलला धाड नाक्याजवळील जैस्वाल यांच्या दारुच्या दुकानासमोर काही युवकांनी बेदम मारहाण करुन जखमी केले आहे. सुभाष लोखंडे व त्यांची पत्नी घटनास्थळी पोहचले असता मुलगा दारुच्या दुकानासमोरील स्लॅबवर पडलेला होता, यावेळी त्याने अजय काकडे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाने तो रोडवर उभा असतांना लाकडी काठीने डोक्यावर व पायावर बेदम मारहाण करुन जखमी करुन शिवीगाळ करीत जीवाने मारुन टाकण्याची धमकी दिली. हर्षलच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सुभाष लोखंडे यांच्या फिर्याद व हर्षलच्या मेडीकल प्रमाणपत्रवरुन आरोपी अजय काकडे व इतर एका जणावर बुलढाणा शहर पोस्टे.ला भांदवीचे कलम 324, 34, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ.रविंद्र हजारे हे करीत आहेत.