शेतपिकाच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे-कृषी मंत्री अब्दुल सत्तार

257

१)चितोडा, अंबिकापूर, कोलवड येथे पाहणी
२)शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
३)अवकाळीचा ६ तालुक्यांना बसला फटका
४)१५०० हेक्टरवर नुकसान

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा-(10 Apr.2023) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विविध शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी यंत्रणांनी दोन दिवसात तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, यातून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

ना.सत्तार यांनी आज सोमवार १० एप्रिल रोजी खामगाव तालुक्यातील चितोडा आणि अंबिकापूर, तसेच बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे भेट देऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत खासदार प्रतापराव जाधव, आ.आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आदी उपस्थित होते. ना.सत्तार यांनी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने एका पट्ट्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्याभागात नुकसान झालेले नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ नुकसान झालेल्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे गतीने पंचनामे होण्यास मदत होईल. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मदत करण्याची भूमिका शासनाची असल्याचे सांगितले.यंत्रणांनी प्रत्येक शिवारात जाऊन सर्वेक्षण करावे, या कामात शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले.

जिल्ह्यात लागोपाठ दोनवेळा अवकाळीचा तडाखा बसल्यामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे.9 एप्रिलच्या रात्री सहा तालुक्यात अवकाळीचे थैमान झाले. दे.राजा, मलकापूर, मेहकर तालुक्यात वीजापडून ५ जनावरांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य पहाता जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी कोलवड येथे नुकसानीची पाहणी केली, तर कृषीमंत्री ना.अब्दूल सत्तार यांनीही नुकसानग्रस्त शेतांना भेटी दिल्या आहे.9 एप्रिलच्या रात्री ९ वाजता जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. सध्या मका पीक काढणे बाकी आहे.काही ठिकाणी ज्वारी व बाजरीचे पिकेही उभे आहे. तर फळ पिके बहरली आहे. येणारा पाऊस या पिकांसाठी काळ ठरला. बुलढाणा शहरा नजीक देऊळघाट, कोलवड अश्या ठिकाणी रात्री विजांसह पाऊस झाला.

तात्काळ सर्व्हे करा-जिल्हाधिकारी

कोलवड येथे रात्री तुफान वारा व पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड, जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कोलवड येथे प्रल्हाद पाटील, शुभम जाधव, पंढरी जाधव, गजानन जाधव, कडुबा जाधव, इंदुबाई जाधव, दिनकर पांडे, संजय जाधव, भालेराव, साहेबराव राऊत, सुभाष जाधव, बबन पाटील, पुरुषोत्तम बावस्कार, संजय बावस्कार, भास्कर पैठणे, पुरुषोत्तम जाधव, विठ्ठल जाधव, रामेश्वर भोपळे, शेषराव जाधव यांच्या शेतातील पीके आडवी झाली. जिल्हाधिकारी यांनी गजानन जाधव व इतर शेतकर्‍यांच्या शेतावर जावून यंत्रणेला तात्काळ नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहे.

गोठ्यावर पडली वीज

रात्रीच्या पावसात मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील तेजराव नहार यांच्या गोठ्यावर वीज पडली. यामध्ये जणावरे बांधली होती, त्यात २ बैल व एक म्हैस ठार झाल्याने त्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे सुपडा महाजन यांच्या शेतात म्हैस तर देऊळगाव राजा तालुक्यातील हरीदास घुगे यांच्या शेतात गायीचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील हिंगणा, चितोडा,पाळा आदी गावांमध्ये वादळी वार्‍याने अनेक वृक्ष कोलमडून पडले, तर चिखली तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी बरसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात एकूण १५०० हेक्टर दरम्यान पीक नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.