गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी समता संघटनेचे धरणे आंदोलन

230

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(12 Apr.2023)गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी आज बुधवार 12 एप्रिल रोजी मोताळा तहसिल कार्यालयासमोर समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई व प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून तात्काळ शासन निर्णय जारी करुन वनहक्क कायद्यानुसार वन हक्काचे पट्टे वाटप करण्याची मागणी करण्यात आली.

भूमिहीन, शेत, मजूर, अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त व अन्य मागासर्गीय लोकांनी गायरान व वन जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेती प्रयोजनासाठी अतिक्रमणे बऱ्याच कालावधीपासून केली आहेत. आपण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गायरान जमिन कसणाऱ्याबाबत मालकी हक्काचे पट्टे करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, अशी घोषणा केली होती. वनहक्क कायद्यानुसार वन हक्काचे पट्टे वाटप केले जातील असे आपण घोषीत केले. महापुरुषांच्या जयंतीचा महिना म्हणून आपण हा महिना समतापर्व म्हणून घोषीत केला आहे. या समता पर्वामध्ये गायरान व वन जमिनीबाबत मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी तात्काळ शासन निर्णय जाहीर करुन गोरगरीबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी समता संघटनेच्यावतीने मोताळा तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष नितीन गवई, राष्ट्रीय अध्यक्ष आम्रपाल वाघमारे, जिल्हाध्यक्ष विजय दोडे, तालुकाध्यक्ष विजय बावस्कर, Adv.काळे, मुख्य संघटक गजानन जाधव, समाधान अवचार, लक्ष्मण दसरे, भारत पैठणे, अरुण भालेराव, वासुदेव निकाळजे, दिलीप गायकवाड, भागचंद येरवाळ, उत्तम मोरे, सुर्यभान इंगळे, रफिक शा, गणेश राठोड, विष्णु बेंडे, गोविंद डांगे, देवीदास चव्हाण यांच्यासह शेकडो महिला व पुरुष धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

यांनी दिला आंदोलनास पाठींबा..

समता संघटनेच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर सुरु केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनास काँग्रेसचे नेते साहेबराव डोंगरे, राजेश गवई, राष्ट्रवादीचे नेते डॉ.शरद काळे, रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सैय्यद वसीम यांनी पाठींबा दिला.