रेशनचा माल काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या अमडापूर येथील दुकानाचा परवाना रद्द !

281

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची धडक कारवाई

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (14 Apr.2023) गोरगरीब लाभार्थ्यांना मालाचे वाटप न करणे, फेब्रुवारी 2023चे दुकानाचे ई-पॉज वरील वाटप केलेले नाही, कळवून देखील अमडापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार गजानन माणीकराव देशमुख हजर न राहता मोबाईल बंद करुन ठेवणे, दुकानात माल न आढळून येणे, तसेच दुकानाबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व कार्डधारकांच्या माल मिळाल्या नसल्याच्या तक्रारी, निरीक्षण अधिकारी व चिखली तहसिलदार यांनी सादर केलेल्या अहवालात गहू, तांदुळ व साखरमध्ये आढळून आलेला फरक, सदर धान्याची अफरातफर करुन काळ्या बाजारात विक्री केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या दुकानाचा परवाना रद्द केला असून तसा आदेश 13 एप्रिल रोजी पारीत केला आहे. तसेच त्यांच्याकडून 2 लक्ष 5 हजार 866 रुपये 7 दिवसात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीमध्ये चिखली तालुक्यातील अमडापूर येथील गजानन माणिकराव देशमुख यांनी रास्त भाव दुकानाचे 194 दिवाळी संच ऑनलाईन वाटप बाकी असल्याचे आढळून आले आहे. सदर संच ऑनलाईन वाटप करण्याच्या सूचना देऊनही ऑनलाईन तसेच फेब्रुवारी 2023चे दुकानाचे E-POS वरील वाटप केले नसल्याचे आढळून आहे. निरीक्षण अधिकारी चिखली यांनी भ्रमणध्वनीवरुन कळवून देखील 4 मार्च 2023 रोजी देशमुख हे दुकानात हजर न राहता देशमुख यांनी मोबाईल बंद ठेवला. रास्त भाव दुकानदार तपासणीचे वेळी हजर नसल्याने अमडापूर गावचे उपसरपंच व इतर ग्रामस्थ समक्ष दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानामध्ये कोणतेही धान्य आढळून आले नाही, कार्डधारकांना दुकानदार देशमुख वेळेवर माल व पावती देत नसल्याचे बयाण दिले, गजानन देशमुख रास्त दुकानदार यांनी दि.महाराष्ट्र शेड्यूल कमोडिटीज (वितरण विनीयमन) आदेश 1975 व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र या रद्द केले असून प्राधिकारपत्राची संपूर्ण अमानत रक्कम शासन जमा केली. तसेच दुकानातील तपासणीमध्ये पुस्तकी शिल्लकसाठा प्रत्यक्षसाठा यामध्ये आढळून आलेल्या मालाची तहसिलदार चिखली तपासणी दरम्यान कमी आढळून आलेल्या एकूण धान्याची रक्कम 2 लाख 5 हजार 866 रुपये 7 दिवसात शासन जमा करावी. तसेच दुकानदार यांच्यावर 12 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयान्वये जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये तहसिलदार/निरीक्षण अधिकारी चिखली यांना फौजदारी स्वरुपाचा गुन्हा संबंधित पोलिस स्टेशनला दाखल करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांनी 13 एप्रिल रोजी पारीत केला आहे.

कार्डधारकांचा आर्त टाहो; साहेब आमचे कार्ड देशमुखकडे ठेवू नका !

लाभार्थ्यांनी तपासणी अधिकाऱ्यांसमोर आर्त टाहो फोडीत, बयाण देतांना सांगितले, साहेब..आमचे कार्ड यापुढे कधीचे देशमुख यांच्या दुकानाला जोडू नका. कारण ते महिला लाभार्थ्यांना गलिच्छ शब्दात बोलतात, माल देत नाही, लाभार्थ्यांचा थंब घेतात आणि माल बाकी असल्याचे लिहून देतात. बयाण घेण्याचे काम संपत आल्यावर दुकानदार आले, त्यावेळी ते पुर्णपणे नशेमध्ये होते, त्यावेळी दुसरे रेशन दुकानदार रत्नपारखी हजर होते, असा अहवाल चिखली निरीक्षण अधिकारी यांनी 5 एप्रिल रेाजी सादर केला आहे. तसेच कार्ड धारकांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांची शिधापत्रिका जवळच्या रास्त भाव दुकानात जोडण्यात आली आहे
——————-