कधी नव्हंत, हेल्याला गवत! मोताळा वनपरिक्षेत्रात अवैध मुरुम खोदकाम करणारे २० लाखाचे जेसीबी जप्त !

1577

मोताळा वनपरिक्षेत्रात मोताळा, बुलढाणा व खामगाव
अधिकाऱ्यांची संयुक्तीक कारवाई

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (12.May.2023)जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलाची कत्तल होवून राजरोसपणे त्याची पध्दतशीरपणे विल्हेवाट लावली जात आहे.तसेच वनविभागांच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून अवैध रेती तसेच गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. आज शुक्रवार १२ मे रोजी वनविभागाच्या तीन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तीकरित्या धडाकेबाज कारवाई करीत पश्चीम कोथळी बिट क्र.४८७ मध्ये अवैधरित्या मुरुम खोदकाम करतांना जेसीबीसह २० लाखाची यंत्रसामुग्री जप्त केली आहे. यामुळे अवैधरित्या मुरुम खोदकाम करणाऱ्यांमध्ये उन्हाळ्यात थंडीची हुडकी भरली आहे.

मोताळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत जवळपास मोताळा, मलकापूर, नांदूरा तसेच खामगाव तालुक्यातील अनेक गावे येतात. रोहिणखेड व राजूर बिट सर्वात मोठी मलिदा देणारी आहे. या बिटमध्ये मोठी कमाई असल्याची चर्चा असून येथून मोठ्या प्रमाणात वनअधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून वनविभागातील गौण खनिजांची अवैध चोरी होत असल्याच्या चर्चा आहेत. काही वर्षापुर्वी या बिटमध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मोठ-मोठ्या कारवाया सुध्दा केलेल्या आहेत. परंतु जुने अधिकारी गेल्याने आता पाहिजे तशा प्रकारच्या कारवाया होतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. परंतु आज शुक्रवार १२ मे रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा (प्रादेशीक)अंतर्गत पश्चिम कोथळी बीट कक्ष क्र.४८७ मध्ये अवैधरित्या मुरुम खोदकाम करतांना मुख्य वनसंरक्षक (प्रा) अमरावती, उपवनसंरक्षक बुलडाणा व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) व कॅम्प बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आली. सदर कारवाई बुलढाणा वनक्षेत्रपाल ए.एन.ठाकरे व मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी एन.ए.मुरकुटे व खामगाव (प्रादेशीक) यांच्या मदतीने अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करुन पलढग धरणामध्ये जेसीबी क्र.एम.एच.२८ ए.झेड. ७५९४ पकडून कृष्णा जवानसिंग कटारे (वय-२५) रा.तरोडा ता.मोताळा यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीचे जेसीबी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कटारे यांच्यावर वनगुन्हा क्र.००६५०/१६२२७/०२ नुसार कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या या कारवाईमुळे वनविभागाच्या जमिनीत अवैधरित्या मुरुम खोदणाऱ्यांमध्ये हुडकी भरली आहे.

मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी सक्षम नाही का?

मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अवैध गौणखनिजांची मोठी वाहतूक होत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. तसेच मोताळा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलाची कत्तल होवून लाकडांची सॉमिलवर विल्हेवाट लावली जात आहे. याकडे मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे वनविभागाच्या जंगलात गौणखनीजाची वाहतूक करणाऱ्या एका जेसीबीला पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मोताळा, बुलढाणा व खामगाव (सरंक्षण) यांना संयुक्तीकरित्या कारवाई करावी लागते ही मोठी शोकांतीकाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!