विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना विमा कवच; अपघातामध्ये मृत्यू झाल्यास 5 लाखाची मदत !

327

शिंदे सरकारचा निर्णय ; शासन निर्णय जारी

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (21.JUNE.2023) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” राबविण्यास मंजुरात देण्यात आली आहे. पंढरपुरला वारीला जातांना वारकऱ्याचा दुर्धटनेत मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 5 लक्ष रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तसा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून तसा शासन निर्णय सुध्दा जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी 15 ते 20 लक्ष वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत , अपघातामध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 5 लक्ष रुपये वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा राबविण्यात येणार आहे. दिंडीच्या दरम्यान अपघातामध्ये कायमचे अपंगत्व व विकलांग आल्यास विमा कंपनीकडून मदत देण्यात येणार आहे, त्यासाठी विमा काढावा लागणार आहे.

असे आहे मदतीचे स्वरुप..

दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास 1 लक्ष रुपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्या 50 हजार रुपये, वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी 35 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी रक्कम असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. ज्यादिवशी विमाहप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून 30 दिवसापर्यंत मुदत राहणार आहे. सदर व्यक्ती मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा नाही, त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

या कारणामुळे मिळणार नाही मदत..

आत्महत्या किंवा तसा प्रयत्न, अमली अथवा मादक पदार्थ्याच्या अंमलाखाली मृत्यू तसेच प्रसूती अथवा बाळंतपणामध्ये मृत्यू किंवा विकलांगता आल्यास, गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्याने मृत्यू किंवा विकलांगता, गुप्तरोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता यांना मदत मिळणार नाही.

अशा आहेत विम्यातील तरतुदी