मोताळा येथे वाहनाच्या धडकेत फार्मासीस्ट ठार

97

मोताळा-(25Sep.203)स्थानिक ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे फार्मासीस्ट म्हणून कर्तव्यावर असलेल्या चेतनकुमार कोवे बुलढाणा येथून मोताळा येथे येत असतांना त्यांना बोराखेडी येथील प्रियदर्शनी महाविद्यालयाजवळ बुलढाणाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ते रोडवर पडून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.

बुलढाणा चैतन्यवाडी येथे राहणारे चेतनकुमार कोवे (वय 32) हे मोताळा ग्रामीण रुग्णालय येथे फार्मासीस्ट म्हणून नोकरीला आहे. ते आज 25 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथून आपली स्कुटी क्र.एम.एच.28 बीआर.1638 दुचाकीने येत असतांना त्यांना एका अज्ञात 407 वाहनाने बुलढाणा-मलकापूर रोडवरील प्रियदर्शनी शाळेजवळ धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, या धडकेत चेतनकुमार कोवे हे रोडवर पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून जखमी कोवे यांना 108 वाहनाने बुलढाणा येथे उपचारार्थ पाठविले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. कोवे यांचे वडील हे चंद्रपूर येथे असून त्यांचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे.