बहुजनमुक्तीच्या प्रवेशाने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली : प्रताप पाटील

33

बुलढाणा :  (LOKSABHA NIVADNUK) सर्व बहुजनांना एकत्रीत करून प्रस्थापितांविरोधात आवाज उठविण्याचे काम बहुजनमुक्ती पार्टी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. जे समाज बहुसंख्येने असतानाही त्यांना विकासापासून दूर ठेवले जाते. बहुजन, उपेक्षित, शोषित घटकांना सत्तेच्या प्रवाहात येऊ दिले जात नाही. मात्र आता इथला बहुजन जागा झाला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बहुजनमुक्ती पार्टीने प्रवेश केल्याने प्रस्थापित महाविकास आधाडी व महायुती उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील यांनी केले.

स्थानिक कृष्णा हॉटेलच्या सभागृहात मंगळवारी बहुजनमुक्ती पार्टीच्यावतीने नामांकन दाखल करण्यापूर्वी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बहुजनमुक्ती पार्टीने अनेकदा रस्त्यावरच्या लढाया लढल्या आहेत. वाढती बेरोजगारी, सीएएच्या विरोधात जिल्हाभरात अनेक आंदोलने केली आहेत. मराठा व धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी संघर्ष केला आणि भविष्यातही संघर्ष सुरूच असेल. बुलढाणा जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट घडवून आणण्यासाठी बहुजनांची मोठी फळी आजघडीला बहुजनमुक्ती पार्टी सोबत उभी आहे. ग्रामीण भागातील विखुरलेला बहुजन समाज एकजुटीने बहुजनमुक्ती मोर्चासोबत उभा असून कार्यकर्त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वशक्तीनिशी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी धनंजय रैदळे, शेख नाजिम कुरैशी, सागर मोरे, सुशीला जवंजाळ, समाधान ताजणे, सुधिर सोनटक्के, विजय इंगळे, गजानन पवार यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जिवंत असल्याची जाणीव करून देण्यासाठी लढा : सुजित बांगर

लोकसभेची निवडणूक आपल्यासाठी नवीन नाही. इथल्या राजकीय व्यवस्थेने बहुजनांना नेहमीच गृहित धरून आपली पोळी शेकण्याचे काम केले आहे. आपले बहुजन संख्येने मोठे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात बहुजनांचे निर्णायक मतदान आहे. मात्र दुदैवाने आपण एकत्रीत नाही. त्यामुळे आपण जिवंत आहोत की नाही, असा प्रश्न आहे. त्यामुळे प्रस्थापितांना आपण जिवंत असल्याची जाणीव करून देण्यासाठी बहुजनमुक्ती पार्टीचा हा लढा आहे. आणि या लढयाचे शिल्पकार प्रताप पाटील असल्याचे यावेळी बहुजनमुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर यांनी सांगितले.

धनगर आरक्षण कृती समितीचा पाठींबा

बहुजनमुक्ती पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रताप पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. त्यांना धनगर समाजाच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे धनगर आरक्षण कृती समितीने प्रताप पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे विदर्भ अध्यक्ष मुरलीधर लांभाडे यांनी दिली. यावेळी धनगर आरक्षण योध्दा गजानन बोरकर आदी उपस्थित होते.