अग्नीशस्त्राची तस्करी करणारा गजाआड; 77 हजाराचा मुद्देमाल जप्त

32

स्थानिक गुन्हा शाखा पथकाची ज.जामोद शहरात कारवाई

जळगाव जामोद: मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या राज्यातील सोनाळा, जळगाव जामोद, तामगाव हद्दीतून जिल्ह्यात छुप्यामार्गाने देशी पिस्टलची मोठी तस्करी होते. या तस्करांना पकडणे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा पथकाने ते ॲक्शन मोडवर येत ज.जामोद शहरातील महाराष्ट्र बँकेजवळ सोमवार 8 एप्रिल रोजी देशी पिस्टलची तस्करी करणाऱ्या शेख जमीन शेख चाँद याच्या मुसक्या आवळीत त्याच्याकडून देशी पिस्टलसह, काडतूस असा 77 हजाराचा मुद्देमाल केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका भयरहीत वातावरणात पार पडाव्या यासाठी पोलिस अधिक्षकांनी कंबर कसली असून मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या सोनाळा, तामगाव, जळगाव जामोद पोलिस हद्दीमधून जिल्ह्यामध्ये अवैध देशी पिस्टल(अग्नीशस्त्र)ची मोठी तस्करी होते. यावर प्रतिबंध तसेच जिल्ह्यात होणारी अवैध पिस्टलची तस्करी रोखण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखे पथकाने सोमवार 8 एप्रिल रोजी ज.जामोद शहरात महाराष्ट्र बॅंकेजवळ शेख जमीन शेख चाँद (वय 31) टिपू सुलतान चौक जामोद याला ताब्यात घेवून त्याच्याकडून देशी बनावटीचे एक अग्नीशस्त्र (पिस्टल) 40 हजार, दोन स्टील मॅग्जीन 500 रुपये, 17 जिवंत काडतूस 17 हजार, मोबाईल 15 हजार असा 77 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन शेख जमीन शेख चाँद याला अटक करण्यात आली. ज.जामोद पोलिसात त्याच्याविरुध्द अग्नीशस्त्र कायद्याचे कलम 3,7/25 आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 123, 135 अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपी व्यतिरिक्त इतर आरोपी आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहे.

पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात कारवाई

जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा प्रभारी पोलिस निरिक्षक अशोक लांडे, सपोनी. आशिष चेचरे, पोउपनी. श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ.दिपक लेकुरवाळे, पोना.गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे यांच्या पथकाने केली.