शासकीय हमीभाव खरेदीमधील अनियमितताविरोधात शेतकरी आक्रमक

11

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ऑनलाईन नंबराप्रमाणे मोजणी न झाल्यास आत्मदहन करु !

मोताळा: तालुक्यात अ‍ॅग्रोरुटस् फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड रेाहिणखेडद्वारा मोताळा तालुक्यात होत असलेल्या शासकिय हमीभाव खरेदीमध्ये अनियमितता होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून ऑनलाईन नोंदणी नबंराप्रमाणे माल मोजणी होवून तत्काळ पावती देण्यात यावी, अन्यथा खरेदी केंद्रावर आत्मदहन करण्याचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सोमवार 24 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

मोताळा तालुक्यातील शासकिय हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी अॅग्रोरूटस् फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड रोहिणखेड ता. मोताळा येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना 19 जून रोजी रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मॅसेज येवून 20 व 21 जून रोजी खरेदी केंद्रावर माल घेवून येण्याचे सांगण्यात आले. मॅसेजमध्ये खरेदी केंद्र मोताळा 1 माल आणण्याचे लिहले असल्याने माल मोजणीसाठी कुठे आणावा यासाठी शेतकऱ्यांनी फोन केला असता त्यांनी चुकून मॅसेज सुटले असून वापस जाण्याचे सांगत २ ते ३ दिवसानंतर माल मोजला जाईल, सध्यास्थितीत ज्वारीचे टार्गेट पुर्ण झाले, असे सांगितले. 22 जून रोजी ज्वारी खरेदी उद्दीष्ट शासनाने वाढवून दिल्याने शेतकऱ्यांनी माल केव्हा घेवून यायचा याबाबत विचारणा केली असता, चार-पाच दिवसानंतर बघू, असे सांगण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी करुन शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाईन नोंदणीप्रमाणे त्यांचा माल मोजून पावती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर प्रभाकर गणपत महाजन, विलास निवृत्ती जुनारे, कैलास कोळसे, रामेश्वर सुरडकर, दादाराव जुनारे, ज्ञानेश्वर शेळके, देवेंद्रसिंग गौर, गंगाधर जोहरी, गजानन जवरे, अमोल पैसोळे, विक्रम देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

माल न मोजता ‘त्यांना’ पावत्या दिल्या?

शासकिय हमीभाव खरेदी चालकाने मुद्दामपणे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकाच वेळी मॅसेज पाठवून चुकून सुटल्याचे सांगत व्यापाराकडून पैसे घेवून त्यांची नावे ऑनलाईन नोंदणीमध्ये उशिरा असतांनाही त्यांचा मालही न मोजता ऑनलाईन माल मोजणीच्या पावत्या त्यांना देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनात केला असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा खरेदी केंद्रावर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाप्रशासनास देण्यात आला आहे.