‘लम्पी’च्या संसर्गाने मृत्यू झालेल्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनास मिळणार मदत!

231

दुधाळ गायीसाठी 30 हजार; बैलासाठी 25 हजार तर वासरासाठी 16 हजार

मोताळा(BNU न्यूज) लम्पीच्या संसर्गाने राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. लम्पीच्या संसर्गाने मोताळा तालुक्यात जवळपास 65 ते 70 जनावरांचा मृत्यू झाला आहे. उपचार करुन देखील जनावरांचा मृत्यू होत असल्याने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन स्तरावरुन लम्पीच्या संसर्गाने शेतकरी व पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधन दुधाळ गायीसाठी 30 हजार, बैलासाठी 25 तर वासरासाठी 16 हजाराची मदत देण्यात येणार आहे.

राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या ववषाणूजन्य व सांसर्गगक लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे शेतकरी, पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास अर्थसहाय्य देण्याबाबत शासन स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या 4 ऑगस्ट 2022 पासून ज्या शेतकरी, पशुपालकांकडील पशुधनाचा मृत्यू झालेला आहे, अशा शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देतांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक
निकषाप्रमाणे सर्वाना अर्थसहाय्य देण्यात यावे. त्याचप्रमाणे अर्थसहाय्य देतांना विचारात घ्यावयाच्या मृत पशुधनाच्या संख्येवरील प्रति कुटुंब निर्बंधांचे निकष सुध्दा शिथील करून लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सर्व पशुधनाच्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अशी आहे मदतीची रक्कम…
शेतकरी व पशुपालकांच्या मृत पशुधनास निकषानुसार दुधाळ जनावरे गायीसाठी 30 हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे (बैल) 25 हजार रुपये तर वासरांसाठी 16 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. सदरचे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी 16 सप्टेंबर 2022 शासन निर्णयातील कार्यपध्दतीत कोणतेच बदल करण्यात आलेले नसून कार्यपध्दती तशीच लागू राहणार आहे.