मोताळा तालुका कागदोपत्रीच झाला 100 टक्के हगणदरीमुक्त!

358

सकाळी-सकाळीच रोडवरच पडलेली असतात फुले

Buldana News Update
मोताळा(10 Dec.2022) मोताळा शहर जरी तालुक्याचे ठिकाण असलेतरी रोडच्या एकाच बाजुला वस्ती असल्याने दुसरीबाजू मात्र ओस असल्यासारखी वाटते. तालुक्यात जवळपास 105 गावे व 65 ग्रामपंचायती असून त्या सर्वच ग्रामपंचायती 100 टक्के हगणदरीमुक्त झाल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात सकाळी-सकाळीच मोठमोठी रंगीबेरंगी वेगवेगळ्या कलरची फुले रोडवर पडलेली दिसतात, तरीही गूडमार्निंग पथकाची नेमणूक केलेली नसल्याने त्या सुगंधीत फुलांचा वास घेवून पाहुणेरावणे, नागरिक व कधीकधी लोकप्रतिनीधींना सुध्दा नाईलास्तव गावात प्रवेश करावा लागतो.

मोताळा तालुक्याची निर्मिती होवून जवळपास 41 वर्ष झाली असतांना देखील तालुक्याच्या पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. मोताळा शहरातील ग्रामपंचायतची नगर पंचायत होवून जवळपास 7 वर्ष झाली, परंतु शहराचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटलेला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मोताळा शहरात सुध्दा अनेकांना उघड्यावरच शौच्याला बसणे आवडत असल्याने आठवडी बाजारातील शौचालय ओस पडले आहे. मोताळा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशासन म्हणते मोताळा तालुक्यातील सर्वच 65 ग्रामपंचायती अंतर्गत असलेले 105 गावे हगणदरीमुक्त झाली, त्याला प्रशासनाने कागदोपत्री मोहोर लावली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेकांनी शौचालयायचे अनुदान लाटून जुनेच शौचालय दाखविले तर काहींनी शौचालय बांधकाम केले परंतु त्यामध्ये शौच्यास जात नसून त्यामध्ये जळतण ठेवल्याची, भयावह स्थिती मोताळा तालुक्यात पहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या खोटारडेपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

मोताळा पं.स.मध्ये सुध्दा शौचालय नाही..
पंचायत समिती मोताळा येथे कार्यालयीन महिला व पुरुष कर्मचारी, अधिकारी कर्तव्यावर आहेत. तसेच अनेक शासकीय कामासाठी नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिलाभगीनी येतात. परंतु पंचायत समिती कार्यालयात सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या शौचालयाचे दरवाजे शनिशिंगणापूर गावाप्रमाणे नसल्याने तसेच शौचालयात घाण साचलेली आहे. महिलांसाठी 2 शौचालयाचे बांधकाम झाले आहे, परंतु त्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्थाच नाही. कर्मचाऱ्यांसाठी दोन शौचालय आहे, परंतु ते चालूच नाही. तरीही मोताळा तालुका कागदोपत्री हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल आहे, हे विशेष!

गूडमार्निंग पथकांची आवश्यकता..
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोताळा तालुका 100 टक्के हगणदरीमुक्त झालेला आहे. या उपरही नागरिक रोडवर शौच्यास बसत असतील तर संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तसा अहवाल पंचायत समितीच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पाठविल्यास त्या गावात गूडमार्निंग पथक नियुक्त केल्या जातील, असे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.