यंदा मोताळा तालुक्यात खरीपात 57995 हे.क्षेत्राचे नियोजन !

283

1100 हे.क्षेत्रावर झाली ठिबक व धुळपेरणी; कपाशीचा पेरा घटणार

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (15.May.2023) मोताळा तालुक्यात खरीपात कृषी विभागाकडून 57 हजार 995 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. मोताळा तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक आहे, परंतु मागीलवर्षी कपाशीला भाव न मिळाल्याने यावर्षी खरीपात 396 हेक्टरवर कपाशीचा पेरा घटणार आहे. तर सोयाबीन व मक्याच्या पेऱ्यामध्ये मागीलवर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढ होणार आहे. 1100 हेक्टरवर ठिबक व धुळपेरणी करण्यात आल्याची माहिती मोताळा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

तालुक्यात बोराखेडी, मोताळा, पिंप्रीगवळी, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, शेलापूर, धामणगाव बढे हे 7 महसूल मंडळे असून एकूण 38070 शेतकरी आहेत. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी 4327.7 हेक्टरवर तृणधान्य पेरणी केली होती, यावर्षी 4615 हेक्टरवर पेरणी केली आहे, तर कडधान्याची मागीलवर्षी 4992.9 हेक्टर तर यावर्षी 5050 हे.क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. मागीलवर्षी तेलबियाची 8132.2 हेक्टरवर होती ती यावर्षी 8205 हेक्टर असून उसाचा पेरा यावर्षी 9.3 हेक्टर वाढणार आहे. तालुक्यात कपाशीचे मुख्य पीक असून त्याचा मोठा पेरा होत होता, परंतु कपाशीला भाव न मिळाल्याने कपाशीच्या पेऱ्यात मागील वर्षाच्या तुलनेत 396 हेक्टर एवढी घट होणार असून मक्याच्या पेऱ्यात 190 हेक्टरवर तर सोयाबीनमध्ये 72.8 हेक्टरवार वाढ होणार आहे.

खर्च निघत नाही मग कपाशी कश्यासाठी ?

मोताळा तालुक्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात केल्या जातो. कपाशीसाठी सरासरी 39 हजार हेक्टर क्षेत्र आहे. मागीलवर्षी 40 हजार 496 हेक्टरवर कपाशीचा पेरा करण्यात आला होता, परंतु कपाशीला भाव मिळाला नाही, मग कपाशीची पेरणी कश्यासाठी करावी, असा संतप्त सवाल एका शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. तसेच कृषी विभागाने सुध्दा कपाशीच्या पेऱ्यात यावर्षी 396 हेक्टर एवढी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.