बोराखेडी पोलिसांची दुचाकी चोरट्यांवर धडक कारवाई; तिघे गजाआड; 3.95 लाखाच्या सात दुचाकी जप्त

31

मोताळा: बोराखेडी पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत तिघा दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 3 लाख 95 हजाराच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. सदर धडक कारवाई ठाणेदार सारंग नवलकार यांच्या पथकाने 17 एप्रिल रोजी केली.

मोताळा तालुक्यातील दुचाकी लंपास होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. त्यातच खरबडी येथील मोहसीन शाह रुम शाह यांची 30 हजार किमतीची जुनी दुचाकी लंपास केल्याची फिर्याद बोराखेडी पोलिसात 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आली. बोराखेडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत गोपनीय माहितीवरुन खरबडी रोड, मोताळा प्रभाग क्र.8 मधील अयान खॉन उर्फ बाबा नुरहसन खॉन याला ताब्यात घेवून त्याच्याकडून होंडा शाईन व काळ्या रंगाची हंक कंपनीची दुचाकी जप्त केली. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याचा साथीदार शेख मुज्जमील उर्फ मुज्ज्या शेख रफिक वार्ड क्र.16 मलकापूर रोड मोताळा व रिधोरा जहागीर येथील विश्वराज प्रकाश सुरडकर यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून काळ्या रंगाची बजाज पल्सर, हिरो फॅशन प्रो, काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेंलडर, काळ्या रंगाची बजाज पल्सर व सिल्वर रंगाची लाल होंडा शाईन अशा 3 लाख 95 हजाराच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या मार्गदर्शन बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकार, पोउपनि.विजयकुमार घुले, पेाहेकाँ.नंदकिशोर धांडे, दिपक पवार, अमोल खराडे, विजय पैठणे, गणेश बरडे, रमेश नरोटे, सुनिल भवटे, सुनिल थोरात, राजेश आगाशे, शरद खर्चे, वैभव खरमळे यांच्या पथकाने केली.