अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्र्यांना घेराव घालून दिले निवेदन

374

मानधन वाढीचा अधिकृत शासन निर्णय काढावा-कॉ.पंजाबराव गायकवाड

मोताळा(BNUन्यूज) पालकमंत्री जिल्ह्यात फारसे दिसत नसल्याने व जिल्हा परिषद समोर आंदोलन करुन देखील काहीच फायदा होत नसल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी 4 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री धा.बढे मार्गे जळगाव खां.कडे जातांना धा.बढे रस्त्यावर रात्री 8 वाजेच्या दरम्यान सेविकांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देवून त्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप केला.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे 4 नोव्हेंबर रोजी एका नियोजित कार्यक्रमासाठी आले असता, रात्री उशीरा ८ वाजता धामणगाव बढे मार्गे जळगाव खान्देश कडे जात असताना रस्त्यावरच पालकमंत्र्यांची गाडी अडवून अंगणवाडी सेविका मदतनीसांनी आपल्या सीटू संघटनेच्या नेतृत्वात सरकारने दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या मानधनवाढीचा अधिकृत शासननिर्णय काढावा, हा शासननिर्णय काढतांना तो किमान २२ हजार रूपये पेक्षा कमी नसावा तसेच ग्रॅज्यूटीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने तातडीने अमंलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, संघटनेच्या जिल्हासचिव प्रतिभाताई वक्ते, लता उबाळे, उज्वला घोंगडे, सुनिता काकर, शोभा पवार, ज्योती बढे, दुर्गा सोनवणे, स्वाती गोरे, प्रतिभा शहाणे, वैशाली गवई, निलोफर मोहम्मद अजीम,रूखमाबाई खोसे, दिपाली दहिभाते, शबाना बी,सपना बावस्कर, ज्योती वाकडे,उषा वाकडे, अनिता शहाने यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी महिला उपस्थित होत्या.

घेराव आंदोलनाचा इशारा सेविकांनी केला पूर्ण..
न्याय्य मागण्यांसाठी १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी सीटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद समोर आंदोलन केले होते. जो पर्यंत सरकार राज्यातील २ लाख १० हजार सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ करित नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ग्रॅज्यूटीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही तोपर्यंत जिथे दिसेल तेथे आमदार, खासदार, पालकमंत्री या लोकप्रतिनिधीना घेराव घालून आंदोलन करण्याचा दिलेला इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन देवून पूर्ण केला, हे विशेष!