6 नोव्हेंबरच्या शेतकऱ्यांच्या बुलढाण्यातील ‘एल्गार’ मोर्चा ठरेल रेकॉर्डब्रेक ! सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर

207

बुलढाणा(BNUन्यूज) भीक मागण्यासाठी नाही तर आपला न्याय्य हक्क मागण्यासाठी आपण मोर्चा काढत आहोत. शेतकऱ्यांचा हा एल्गार मोर्चा सरकारला हादरा बसविणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची ही लढाई असून या निमित्ताने सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवूनच देऊ, असा इशार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलढाण्यात ६ नोव्हेंबर रोजी सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमिवर गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर जिल्हाभर फिरत आहे. गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एल्गार मोर्चाचे वातावरण आता जिल्ह्यात चांगलेच तापले असून हा मोर्चा सर्व मोर्चोचे रेकॉर्ड तोडले, एवढी गर्दी या मोर्चाला होणार आहे. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांबाबत बोलायला सध्या कुणीच पुढे येत नाही आता शेतकऱ्यांनाच आपल्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. हा लढा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आहे. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून लढा दिल्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही त्यामुळे आता सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवूनच देऊ, सोयाबीन-कापसाला भाव मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान एल्गार मोर्चासाठी शेतकरी आता स्वत:हून पुढे येत आहेत. गावोगावी मोर्चाची जोरदार तयारी सुरु असून जिल्हाभरात वातावरण पेटले आहे, त्यामुळे एल्गार मोर्चाकडे आता सर्वांचचे लक्ष लागून आहे.

चिखली व बुलढाणा तालुक्यात बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद..
गावागावातून एल्गार मोर्चासाठी शेतकरी, शेतमजूर सज्ज झाले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील डोंगरशेवली, धोडप, शेलसूर, शेलोडी, पळसखेड सपकाळ, करवंड, केळवद, किन्होळा तसेच बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रूक, खुपगाव, रुईखेड टेकाळे यासह इतर काही गावांना भेटी दिल्या. या गावांमध्ये झालेल्या बैठका, सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.