भोरटेक येथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

373

buldanannewsupdate.com 
मोताळा(19 Dec.2022) मोताळा तालुक्यातील भोरटेक येथे एका 50 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज सोमवार 19 डिसेंबर रोजी घडली. मृतकाचे नाव बारसू गायकवाड असे आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भोरटेक येथे बारसु परशराम गायकवाड (वय 50)आपल्या कुटुंबीयासमवेत राहत होते. त्यांच्याकडे 2 एकर शेती असल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग सुरु केला होता. संसाराचा गाडा सुखात चालू असतांना 2 वर्षापुर्वी त्यांच्या पत्नीचा मोठा अपघात झाल्याने होत्याचे नव्हते झाले. पत्नीच्या उपचारासाठी गायकवाड यांनी 4 ते 5 लाखाचे कर्ज घेवून पत्नीवर उपचार केले. त्यातच त्यांनी उभारलेला रेशीम उद्योग फेल ठरल्याने खाजगी तसेच स्टेट बँक शाखा मोताळाचे कर्ज कसे फेडावे? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतच त्यांनी 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता विष प्राशन केले होते. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु आज 19 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात 3 मुले, पत्नी असा आप्त परिवार आहे.